
मुंबई: महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ नुसार परवाना धारक ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना व्यवसाय करताना ‘पांढऱ्या रंगाचा शर्ट (बुश शर्ट)’ व ‘खाकी रंगाची पॅंट’ असा गणवेश परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच ओळखपत्र प्रदर्शित करणेही अनिवार्य आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत लवकरच ऑटोरिक्षा व टॅक्सींची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये वाहन परवाना धारकांनी वाहनांची वैध कागदपत्रे बाळगणे आवश्यक आहे. तसेच वाहन तपासणी, नूतनीकरण आदी कामकाज करताना गणवेश परिधान करून गरज नसलेली गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपासणीत दोषी आढळल्यास संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही भोसले यांनी दिली आहे.