ब्रेकिंग न्यूज

कमरेला बंदूक लावून फिरणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

बीड जिल्हयात अवैध व्यवसाय,अवैध शस्त्र तसेच गुंडगिरी करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कारवाया होत आहेत. कारवायांचाच एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यां विरुध्द मोहिम उघडलेली आहे.त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. सदर माहितीच्या आधारे दिनांक १६/०५/२०२५ रोजी सकाळी ०५.३० वा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे १) अमोल रामहरी कांदे, वय ३२ वर्षे, रा. माणिकनगर, परळी वैजनाथ, २) पांडूरंग प्रकाश शेंडगे, वय ३० वर्षे, रा. एलआयसी कॉलनी, रिंगरोड लातूर यांना पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये कमरेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला. तसेच त्यासोबत ०३ जीवंत काडतूस देखिल मिळून आले. दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा/पिस्टल (अग्नीशस्त्र) व ०३ जीवंत काडतूस असा एकूण ४३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर अवैध गावठी कट्टा/पिस्टल बाबत सदर अटक आरोर्पीकडे विचारपूस करता त्यांनी तो सतीष मुंडे, रा. डाबी, ता. परळी व मनोहर मुंडे, रा. बेलंबा, ता. परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले असून सदर चारही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ येथे पोलीस अंमलदार श्री विष्णू बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. १०४/२०२५, कलम ३, २५ भारताचा शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे. तसेच गावठी पिस्टलसह पकडलेल्या वरील दोन इसमांना अटक करण्यात येऊन मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांची एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली. पिस्टल विकणारे दोन आरोपी १) सतीष मुंडे व २) मनोहर मुंडे यांचा गुन्हयाचे तपासी अधिकारी प्रविण जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस ठाणे संभाजीनगर,परळी हे शोध घेत आहेत.

सदरील कारवाई नवनीत काँवत पोलीस अधिक्षक बीड,चेतना तिडके,अप्पर पोलीस अधिक्षक, अंबाजोगाई शिवाजी बंटेवाड,प्रभारी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,बीड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोह/विकास राठोड,पोलीस अंमलदार विष्णू सानप,नितीन वडमारे, विक्की सुरवसे यांनी केली आहे.

आनंद वीर

जिल्हा प्रतिनिधी | बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button