आष्टी तालुक्यातील टाकळी अमिया शेत वस्तीवर रस्त्याचा अभाव;
रुग्णसेवेअभावी गर्भवती माता, लहान मुले, वृद्धांचे हाल

कडा. बा. म..पवार– टाकळी अमिया (ता. आष्टी) येथील शेत वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांना विशेषतः आजारी लहान मुले, वृद्ध आणि गर्भवती महिलांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे सगळीकडे चिखलाचे साम्राज्य झाले असून, जीवनावश्यक सेवा तसेच रुग्णवाहिकेसुद्धा या भागात पोहोचू शकत नाही.
या परिसरातील नागरिकांना वस्तीपर्यंत पोहचण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वेशीपासून वस्तीपर्यंतचा रस्ता खड्डेमय असून, पावसात पूर्णतः खराब झाला आहे. अशा स्थितीत आजारी व्यक्ती आणि गरोदर महिलांची तातडीने वैद्यकीय मदत मिळणे जवळपास अशक्य झाले आहे.
या पार्श्वभूमीवर येथील सामाजिक कार्यकर्ते सावता अण्णा ससाने यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, मौजे गावातील सर्व वस्ती ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून रस्ते उपलब्ध करावेत, तसेच गरोदर महिलांसाठी तातडीची रुग्णसेवा पोहचवावी. त्यांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले असून, लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.
ग्रामीण भागात रस्त्यांचा अभाव आणि आरोग्यसेवांचा अपुरा पुरवठा ही आजही मोठी समस्या असून, संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.