
महाराष्ट्रात आज जो मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे, त्याचे मूळ 23 मार्च 1994 च्या अध्यादेशामध्ये आहे. त्या वेळी जातीच्या मतांचे राजकारण करून शरद पवार यांनी जो चुकीचा निर्णय घेतला, त्याने आज जाती जातींमधली तेढ वाढली, अशी घणाघाती टीका साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.
पण आता हा संघर्ष थांबवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करत त्यांच्या सद्यस्थितीनुसार प्रत्येकाला आरक्षण द्यावे, अशी भूमिका उदयनराजे भोसले यांनी मांडली.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कोरेगाव येथे आयोजित आभार मेळाव्यात उदयनराजे बोलत होते. सध्या राज्यात सर्वत्र पेटलेल्या मराठा आणि ओबीसी संघर्षांचा संदर्भ देत उदयनराजे यांनी याला राजकीय हेतूने इतिहासात घेतलेले निर्णय जबाबदार असल्याचा आरोप केला. यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना दोषी ठरवत उदयनराजे म्हणाले, की आजच्या या वादाचे मूळ २३ मार्च १९९४ रोजी काढलेल्या अध्यादेशात आहे. त्या वेळी या जातीच्या राजकारणाचा फायदा घेण्यासाठी शरद पवारांनी चुकीचे निर्णय घेतले. त्या निर्णयाचा फटका आज मराठा आणि ओबीसी या दोन्हीही वर्गातील गरिबांना बसत आहे. यानंतरही अनेक राजकारण्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वेळोवेळी जातीजातींमध्ये भांडणे लावण्याचे काम केले. गेल्या अनेक वर्षांच्या कृत्यांमुळेच महाराष्ट्रातील जातीय स्थिती अशी स्फोटक झाली आहे. ज्येष्ठ म्हणवणाऱ्या नेत्यांकडून त्या वेळी योग्य निर्णय घेतले असते, तर महाराष्ट्राची आजची सामाजिक स्थिती अशी झाली नसती. आता हे सर्व नेते सध्या सोयीस्कर शांत असून, महायुतीच्या सरकारवर जबाबदारी ढकलत आहेत, असा प्रहार उदयनराजे यांनी शरद पवार यांच्यावर केला. पण आता हा संघर्ष थांबवायचा असेल, तर जातनिहाय जनगणना करत प्रत्येकाच्यास द्यस्थितीनुसार त्या – त्या जातीला आरक्षण द्यावे, अशीभू मिका उदयनराजे यांनी या वेळी मांडली.