जरांगे यांचें उपोषण ५ व्यां दिवशी स्थगित

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. सलाईन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही. समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे. आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे, असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना म्हटले आहे.मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मी माझ्या मनातून आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सलाईन घेऊन शरीराला काही होत नाही, असे आंदोलन करण्यात काही हरकत नाही. शंभूराज देसाई यांनी दोन महिन्याचा वेळ मागितला होता, तो आम्ही देत आहोत, 13 ऑगस्टपर्यंत सरकारला वेळ दिला आहे. आज दुपारी गावातील महिलांना हाताने पाणी पिऊन मी माझे उपोषण स्थगित करणार, असं मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे.खुर्ची ओढण्यासाठी तयारी करावी लागेल मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचा ज्या खुर्चीत जीव आहे, ती खुर्ची ओढण्यासाठी आता मला तयारी करावी लागेल. मी इथे झोपून कशाला वेळ घालू. त्यापेक्षा मला राज्यात फिरता येईल. सभा, रॅली करता येईल. विधानसभेसाठी तयारी करता येईल. पण, असं झोपून राहून काहीच उपयोग होणार नाही. कोणी भेटायला आला नाही म्हणून मला फरक पडत नाही. मी मराठा आहे, जातीवंत मराठा आहे. खानदानी आहे. माझ्या शक्तीच्या बळावर मी आंदोलन करतो. मी न्याय हिसकावून आणतो.
बेगडी उपोषण नको
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणतेही मंत्री आले नाहीत, कारण त्यांना वाटते की कोणत्या तोंडाने यावे. त्यांनी मराठ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. उपोषण करायला मी तयार आहे, पण असले बेगडी उपोषण नको. सलाईन लावून उपोषण होत नसते. हा फक्त वेळकाढूपणा झाला. सलाईन लावून पडण्यात काही उपयोग नाही. समाजाचा प्रचंड दबाव आहे. वेळ लागला तरी चालेल पण तुम्ही देखील आम्हाला हवे असल्याचे समाज म्हणत आहे. त्यामुळे उपोषण थांबवत आहे, असे जरांगे म्हणाले.