
गेवराई दि.१५ ( बापू गाडेकर ) :- बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी आणलेल्या १८ नव्या कोऱ्या तलवारीसह एका आरोपीला गेवराई पोलिसांनी सापळा रचून मोठया शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.ऐन सण-उत्सवाच्या काळात पोलिसांनी हि धाडसी कारवाई केल्याने गेवराई तालुक्यासह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी रात्री तीन वाजता पोलिसांनी मोठया शिताफीने एका आरोपीला अटक करून एक दुचाकी मोटारसायकल व १८ नव्या कोऱ्या तलवारी जप्त केल्या आहेत. गेवराई पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी म्हटले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भगवान फकिरा पवार रा.हिरापूर ता.गेवराई जि.बीड हा गैरमार्गाने तलवारी आणून विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे या आरोपीचा शोध पोलिस अधिकारी घेत होते. परंतु आरोपीचे लोकेशन मिळत नव्हते. शनिवार दि.१४ सप्टेंबर रोजी लोकेशन मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून १८ नव्या कोऱ्या तलवारी, एक दुचाकी मोटारसायकल ताब्यात घेऊन आरोपीला पकडले. गेवराईचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांना गोपनीय माहितीगाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर हाॅटेल त्रिमूर्ती, पाडळसिंगी टोलनाक्याजवळ सापळा रचून आरोपी भगवान फकिरा पवार (वय ४० वर्षे) यास मुद्देमालासह ताब्यात घेतले. सपोनि दिपक लंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ४/२५ आर्म ॲक्ट १९५९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराईचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर, सपोनि दिपक लंके, सपोनि संतोष जंजाळ, सपोनि सचिन कापूरे, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर यांच्यासह त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली आहे. या कारवाईने बीड जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली असून या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर हे करत आहेत.