उद्या बीड जिल्हा बंदची हाक.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनच्या समर्थनात बीड जिल्हा बंद

आनंद वीर(प्रतिनिधी) मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा अमरण उपोषण सुरू केले असून त्यांच्या उपोषणाला संपूर्ण मराठा समाजाचे समर्थन आहे. उपोषणाच्या समर्थनार्थ दि. २१ सप्टेंबर रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा संघर्ष योद्धा जरांगे हे उपोषणास बसले असून उपोषणाचा पाचवा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे.सुरूवातीला आंदोलन केल्यानंतर सत्तेतील विविध मंत्र्यांनी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. यानंतर मुंबईवर मोर्चा काढल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी “सगेसोयरेचे”अधिसुचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिलेला होता. तो शब्द अद्यापही पाळलेला नाही. यानंतरही उपोषण करण्यात आलेले असून प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, परंतु शब्द पाळला जात नसल्याने आता सहाव्यांदा मनोज जरांगे पाटील यांनी अंतिम लढाई उपोषणाच्या माध्यमातून सुरू केली आहे. वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगेसोयरे अधिसुचनेची अंमलबजावणी तात्कळ करावा,हैदराबाद, मुंबई आणि सातारा गॅझेट लागू करा,अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमीत्ताने दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत,मराठा आरक्षणासाठी बलीदान दिलेल्या कुटूंबातील सदस्यांना शासकिय नोकरी देण्यात यावी,मागेल त्या गरजवंत मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, मराठा आणि कुणबी एकच आहे हा अद्यादेश पारीत करण्यात यावा,अशा मागण्या आहेत. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केले असून आता उपोषणाच्या पाचव्या दिवशी अखंड मराठा समाजाच्या वतीने दि.२१ सप्टेंबर रोजी शनिवार रोजी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे.यात अत्यावश्यक सेवा या बंदमधून वगळण्यात आलेले आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपआपले व्यवसाय बंद ठेवून सहकार्य करावे,असे अवाहन करण्यात आले आहे. बंदच्या दिवशी संबधित तहसीलदार किंवा पोलीस ठाण्यातील अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत.बीड तालुक्यातील सर्व मराठा सेवकांनी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी जमा होऊन निवेदन देण्यात येणार आहे.मराठा सेवकांनी हा बंद शांततेत पाळावा,असेही अवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.