बीड रुग्णालयातील म.न.से.राडा प्रकरणी करण लोंढे पोलिसांच्या ताब्यात !
गंभीर जखमी रुग्णाला तात्काळ उपचार केला नसल्याने मनसे स्टाईल राडा

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड- शहरात शनिवार दिनांक 21 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला होता, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु कर्तव्यावर असलेले डॉक्टरानी गंभीर जखमी झालेल्या तरुणाला खाजगी रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला दिल्याने मनसे पदाधिकारी त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन रुग्णालयात एका डॉक्टराला धक्काबुक्की करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर बीड शहर पोलिसांनी सोमवारी (दि.२२) पहाटे ५ च्या सुमारास मनसेच्या बीड शहराध्यक्ष करण लोंढेला अटक केली आहे. जिल्हा रुग्णालयातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. यानंतर पोलिसांनी लोंढेला बीड शहरातील राहत्या घरातून ताब्यात घेतले.बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी स्वतः जिल्हा रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओची दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संदीप सानप या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण लोंढे व मनसे पदाधिकारी कदमवर गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी रात्री बीडच्या जिल्हा रुग्णालयात कार्तिक नावाच्या डॉक्टराला मनसेचे शहराध्यक्ष करण लोंढे व अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. या घटनेमुळे बीड जिल्ह्यातील निवासी डॉक्टर रुग्णालय सोडून जाण्याच्या मानसिकतेत आले होते. अनेकांनी आमच्या सुरक्षेची काळजी घ्या तेंव्हाच आम्ही वैद्यकीय सेवा देऊ अशी भूमिका ही घेतली होती. दरम्यान शहर पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे. अखेर बीड शहर पोलिसांनी करन लोंढेला सोमवारी पहाटे ताब्यात घेतले आहे. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.ही कारवाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ, पोलीस राठोड,सिरसाट,मनोज परजने, अशपाक सय्यद यांनी केली.