धनंजय मुंडे सुद्धा येणार दसरा मेळाव्याला !
दसरा मेळाव्यात प्रथमच भाऊ-बहीण एकत्र येणार.

वीर (प्रतिनीधी)भगवानगडावरील दसरा मेळाव्यातील राजकीय भाषणे बंद करण्याचा निर्णय महंत नामदेवशास्त्री यांनी घेतल्यानंतर माजी मंत्री पंकजा मुंडेंनी भगवानबाबा यांचे जन्मगाव असणाऱ्या सावरगाव येथे दसरा मेळावा सुरु केला होता.या ठिकाणी भगवान भक्ती गड म्हणून पंकजा मुंडेंनी भगवानबाबा मंदिर बांधले. आता पंकजा मुंडेंनी भगवान भक्ती गडावर सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला प्रथमच मंत्री धनंजय मुंडे हजेरी लावणार आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा मुंडे बहिण भाऊ एकत्र येणार आहेत.भगवानगडावरील दसरा मेळाव्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे होणारे भाषण राज्यात आकर्षणाचा विषय ठरायचे. पण २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली निधनानंतर गडावरील दसरा मेळाव्यात राजकीय भाषणे बंद करण्याचा निर्णय महंत नामदेवशास्त्री यांनी घेतला होता.त्यावेळी या नणवामुळे मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांनी मग भगवानबाबा यांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथे भगवान भक्ती गडाची स्थापना केली होती. अगदी ‘भगवानबाबा आता याच भगवान भक्ती गडावर असल्याचे’ विधानही पंकजा मुंडे यांनी केले होते आणि याच ठिकाणी दसरा मेळाव्याची परंपरा सुरु केली होती.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात मुंडे बहिण भाऊ एकत्र आले होते. आता पंकजा मुंडेंनी सुरु केलेल्या दसरा मेळाव्याला स्वतः धनंजय मुंडे हजेरी लावणार आहेत. धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमांद्वारे ही माहिती दिली आहे. ‘मी प्रथमच येतोय, आपणही या’ असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होत आहे. या पार्श्वभूमीवर भगवान भक्ती गडाच्या दसरा मेळाव्याला मुंडेंची उपस्थिती वेगळे महत्व असणारी आहे.