संपत्तीच्या वादातून पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न !
मारहाण करत चाकूने केले वार,सात जनावर पोलिसात गुन्हा दाखल.

आनंद वीर(प्रतिनिधी)केज शहरातील फुले नगर भागातील व्यापारी नितीन काळे यांचे बऱ्याच दिवसापासून पत्नी सोबत वाद होता.पती – पत्नीत असलेल्या संपत्तीच्या वादातून नितीन काळे त्याच्या पत्नी,मुलीने इतरांच्या मदतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी पत्नी,मुलीसह इतर ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शहरातील फुलेनगर भागातील नितीन शाहूराव काळे (वय ४१) व त्यांची पत्नी प्रतिभा नितीन काळे या दोघांमध्ये मागील एक वर्षांपासून संपत्तीचा वाद आहे.त्यांना २ मुली व १ मुलगा आहे.नितीन हे १५ ऑक्टोबर रात्री ७ वाजेच्या सुमारास पानटपरीवर असताना त्यांची पत्नी प्रतिभा काळे,मुलगी सिद्धी काळे,विशाल दत्तात्रय मस्के,बाबा पठाण हे चौघे दुकानावर आले.प्रतिभा हिने त्यांना दुकानाच्या बाहेर ये म्हणत शिवीगाळ करू लागल्याने नितीन यांनी शिवीगाळ करू नको म्हणत दुकानाबाहेर आले.त्यांना विशाल मस्के, बाबा पठाण, मुलगी सिध्दी या तिघांनी पकडले. तर त्यांच्या पत्नी प्रतिभा हिने बॅगेत आणलेली पेट्रोलची बाटली काढून पती नितीनच्या अंगावर ओतून जिवे मारण्याच्या उद्देशाने काडी पेटीची काढी ओढून त्यांच्या अंगावर टाकत असताना त्यांनी झटापट करून सुटका केली.ते ठाण्याकडे पळत असताना वाटेत उभ्या असलेल्या निखील समुद्रे,सुरज नाईकवाडे,करण हजारे (रा.केज) या तिघांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण करीत निखील समुद्रे याने चाकुने हाताच्या दंडावर वार केला. ते मोठ्याने ओरडले असता आजूबाजुचे लोक दुकानातून बाहेर आल्याने त्यांना पाहून निखील समुद्रे याने तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत निघून गेले. अशी तक्रार नितीन काळे यांनी दिल्यावरून प्रतिभा काळे, विशाल मस्के, बाबा पठाण, निखील समुद्रे, सिध्दी काळे, सुरज नाईकवाडे, करण हजारे या ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.जखमी नितीन काळे रुग्णालयात उपचार घेत असून पुढील तपास फौजदार राजेश पाटील हे करीत आहेत.