
आनंद वीर(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक उमेदवार यादी अंतिम टप्प्यात आली असताना सर्वच राजकीय पक्षाकडून तगडे उमेदवार देण्यात येत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत परळीच्या उमेदवाराची देखील घोषणा करण्यात आली आहे. शरद पवारांनी परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडें विरोधात आता राजेसाहेब देशमुख यांचे नाव जाहीर करण्यात आले. राजेभाऊ फड यांनी परळी मध्ये प्रचारा सुरुवात केली होती परंतु ऐनवेळी देशमुख यांना उमेदवारी दिल्याने फड समर्थकाने शरद पवारांच्या फोटोला फासली शाई दरम्यान राजेसाहेब यांची उमेदवारी जाहीर करताच पक्षातील इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे चित्र आहे. इच्छुक उमेदवार राजेभाऊ फड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांची कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राजाभाऊ फड यांच्या कार्यालयाबाहेर लावण्यात आलेले शरद पवार यांचे आणि पक्षाचे बॅनर संतप्त कार्यकर्त्यांनी फाडून टाकले आहेत. तसेच शरद पवारांच्या बॅनरवरील फोटोला फड यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शाई फासली आहे. परळीतून राजेभाऊ फड होते इच्छुक परळी विधानसभा मतदारसंघातून राजेभाऊ फड हे इच्छुक आणि संभाव्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांनी तशी तयारी देखील केली होती. मागील पंधरा दिवसांपासून ते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. त्यांची पवारांसोबत बैठक देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आज शरद पवारांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राजेभाऊ फड हे उद्या अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज करणार असल्याचे समजते.