केज , भाजपच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आ. पंकजाताई यांना यश
आ.नमिता मुंदडा यांच्या प्रचारात उतरणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी):–
केज विधानसभा मतदारसंघातील भाजप च्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीत आ.पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव हा मुंडे समर्थकांच्या जिव्हारी लागला होता. महायुतीच्या उमेदवार आ. नमिताताई मुंदडा यांच्यावर असलेली केज परिसरातील भाजपच्या काही निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात भाजप नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांना यश आले असून बंडोबाना त्यांनी थंडोबा केल्याच्या माहिती असून आ. मुंदडा यांचं पारड मजबूत होण्यास चांगलीच मदत होणार आहे.
केज मतदार संघातील भाजप महायुतीच्या उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांच्या विरोधात मतदार संघातील सर्व विरोधकांनी एकत्रित येऊन त्यांची कोंडी केलेली आहे. भाजपनेत्या आ.पंकजाताई मुंडे या आता आ.नमिता मुंदडा यांच्या मदतीला सरसावल्याचे दिसत आहे.
मागील काही वर्षात केज मतदार संघात आ. पंकजाताई मुंडे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांची आपली कामे आमदाराकडे होत नसल्याने व वेळोवेळी अपमानित व्हावे लागले. आ.नमिता मुंदडा व मुंदडा कुटुंबियांवर त्यांची नाराजी होती, यात पुन्हा लोकसभा निवडणुकीत आ.पंकजाताई मुंडे यांचा झालेला पराभव हा मुंडे समर्थकांच्या जिव्हारी लागला होता. त्या मुळे मुंडे समर्थक कार्यकर्ते बंड पुकारून काल पर्यंत आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेले दिसत नव्हते. केज मतदारसंघातील नाराज कार्यकर्त्यांची समज काढावी यासाठी आमदार पती अक्षय मुंदडा यांनी पंकजाताई यांना नाराज कार्यकर्त्यांची समज काढावी यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यानंतर शनिवारी रात्री भाजप प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी केज विधानसभा मतदारसंघातील संतोष हांगे, रमाकांत मुंडे, राणा डोईफोडे, विष्णू घुले, विजयकांत मुंडे सह सर्व बंडोबा भाजप कार्यकर्त्या समवेत अक्षय मुंदंडा यांची आ. पंकजाताई यांनी बैठक लावून बंडोबाला थंडोबा करण्यात यश मिळवले. भाजपाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आ. पंकजा मुंडे यांनी या सर्व कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली. केज मध्ये उमेदवार मी आहे असे गृहीत धरून तन-मन-धनाने कामाला लागा अशा सूचना करताच या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी पंकजाताईंना आश्वासन दिल्याचेही समजते. या बैठकीत झालेल्या चर्चे नंतर सर्व बंडोबा लवकरच आ.नमिताताई मुंदडा यांना विजयी करण्यासाठी कामाला लागणार असल्याचे समजते.