ताज्या घडामोडी

चक्क ! जिल्हाधिकाऱ्यांनी पाठलाग करून पकडला वाळू वाहतूक करणारा टिप्पर !

महसूल विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षाने जिल्ह्यात शेकडो हायवा ने अवैध वाळू वाहतूक.

 

बीड जिल्ह्यामध्ये वाळू उपसा, गौण खनिज  वाहतूकिवर बंदी असता देखील बीड जिल्ह्यात दररोज शेकडो वाहनाने वाळू वाहतूक केली जाते. याकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण केल्यानेच वाळू उपसा व वाहतूक जोरात होते. मंगळवार दिनांक 26 रोजी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक मध्यरात्रीच्या सुमारास गेवराई कडून बीडकडे येत असताना त्यांना वाळूने भरलेल्या दोन हायवा दिसल्या.जिल्हाधिकारी यांनी या हायवा थांबविण्याच्या सूचना दिल्या परंतु हायवाच्या चालकांनी हुलकावणी देत वेगाने पळविल्या . जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सुद्धा त्यांचा पाठलाग करत पाडळसिंगी टोल नाका येथे त्यांना गाठले.यावेळी त्यांनी योगेश तुकाराम गीते , राहणार अंदरुड , जिल्हा धाराशिव यांची हायवा क्रमांक MH 48 CQ 2789 तसेच शेख उमर शेख गफार, राहणार खासबाग देवी, बीड यांची हायवा क्रमांक MH 12 QW 9597 या हायवा पकडल्या.अत्यंत सिनेस्टाईल पद्धतीने केलेल्या या कारवाई दरम्यान पाठलाग करता करता जिल्हाधिकाऱ्यांनी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांना फोन करून तात्काळ सदरील वाहने कोणत्याही परिस्थितीत पळून जाता कामा नये ,अशा सूचना देत तात्काळ बोलावले . यावेळी गेवराई पोलीस स्टेशनचे गस्तीवर असलेले अधिकारी , टोल नाक्यावरील पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी वाहने थांबवून ठेवले . यावेळी तात्काळ बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके , नायब तहसीलदार प्रशांत जाधवर , तलाठी दादा शेळके , तलाठी कृष्णा रत्नपारखी घटनास्थळी पोहोचले . जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाहने थांबविल्यानंतर त्यात किती वाळू आहे याची पाहणी केली . त्यावेळी त्यांना दोन्ही वाहनात अंदाजे प्रत्येकी सहा ब्रास वाळू असल्याचे दिसून आले . वाहनांच्या चालकांना त्यांनी विचारणा केली की सदरची वाळू वाहतूक करण्यासाठी तुमच्याकडे परवाना आहे काय , यावर चालकांनी आमच्याकडे असा परवाना नसल्याचे सांगितले . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील कारवाईसाठी सदरची वाहने बीड येथे घेऊन जाण्याबाबत तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी त्या वाहनाचा पंचनामा करून वाहन पोलीस मुख्यालयात लावण्यात आली.रात्री सुमारे 3 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती.

 

       जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी शिताफिने वाळू वाहणाऱ्या वाहनांवर कारवाई केल्यामुळे आणि त्यावर प्रादेशिक परिवहन विभागामार्फत कारवाई तसेच बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या पथकाने केलेली कारवाई अशा तिहेरी स्वरूपाच्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे . जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अशाच प्रकारच्या कारवाया जिल्हाभर सुरू ठेवण्याबाबत सर्व संबंधित विभागांना सुचित केल्या आहेत.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button