सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे.
देशमुख हत्येतील इतर आरोपीच्या शोध लावण्यास बीड पोलीस अपयशी ?

बीड (प्रतिनिधी) मागील काही महिन्यापासून पोलिसाचा गुंडावर धाक राहिला नसल्याने बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली, गुंडांच्या टोळीने डोके वर काढले आहे.केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे पवनचक्कीच्या वादातून दिवसाढवळ्या अपहरण व हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशावरुन सदर प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सीआयडीचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर करणार आहेत.केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे दि.९ डिसेंबर रोजी अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात सुदर्शन घुले याच्यासह इतरांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात जयराम माणिक चाटे,रा.तांबवा ता. केज, महेश सखाराम केदार, रा. मैंदवाडी ता. धारुर आणि प्रतिक भीमराव घुले या तिघांना अटक केलेलीआहे.मात्र इतर आरोपी फरार असल्याने पोलिसाविषयी जिल्ह्यात रोष व्यक्त होत असून. हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद जिल्हाभरात उमटले असून सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी देशमुख कुटुंबियाची भेट दिली आहे. हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी देशमुख कुटुंबीय, मसाजोग येथील नागरिक व राजकीय प्रतिनिधींनी कडून करण्यात येत होती.त्या अनुषंगाने पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरुन सरपंच देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे.