पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा मृत्यू,महाराष्ट्र बंदची हाक !

परभणी शहरातील भारतीय संविधानाचे निर्माते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील सविधान प्रतिकृतीची विटंबना एका मनोरुग्णाकडून करण्यात आल्यानंतर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दगडफेक,जाळपोळ करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी काही आंदोलन कर्त्याना ताब्यात घेतले होते, पोलिसांनी आंदोलन कर्त्याला मारहाण करतानाचे व्हिडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाले होते. त्यापैकी एका भीमसैनिकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी संविधान प्रेमी संघटना आणि पक्षांना सोमवारी 16 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. परभणी येथील वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे, हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
अॅड.आंबेडकर यांनी म्हटले आहे की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने, आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी. याचे चित्रीकरण करण्यात यावे. फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केले जावे अशी मागणी केली असून सोमवारी महाराष्ट्र बंदची देण्यात आली आहे.