
अंबाजोगाई (प्रतिनिधी):– बीड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंबाजोगाईत सापळा लावून मोटारसायकल चोरांच्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. यावेळी चोरट्यांकडून १९ मोटारसायकलसह जवळपास ९ लाख मुद्देमाल जप्त केला.
अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या गुन्ह्यातील मोटारसायकल वीरसिंग शेरसिंग गोके ,रा. सा.बां.कार्यालय जवळ, सदर बाजार रोड, अंबाजोगाई याने चोरली असून तो चोरीच्या गाड्या विक्री करण्यासाठी चनई रोडवरील सीताफळ संशोधन केंद्राजवळ येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेस मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरिक्षक उस्मान शेख यांनी त्या परिसरात सापळा रचला. यावेळी पोलिसांना पाहताच पळून जाण्याच्या बेतात असणाऱ्या वीरसिंगला पोलिसांनी पाठलाग करून पकडला. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरात लपवलेल्या दहा मोटारसायकल पोलिसांना दाखवल्या. तसेच, त्याने गाडी विकताना फायनान्सची असल्याचे कारण भासवुन कागदपत्र नंतर देतो असे सांगत आठ मोटारसायकल विकल्या होत्या. पोलिसांनी या सर्व १८ मोटारसायकल जप्त केल्या. पोलीस वीरसिंगच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांचे मार्गदर्शनाखाली,पोलिस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस कर्मचारी मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, विकास राठोड, विष्णु सानप, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, मच्छिंद्र बीडकर, सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे व चालक नितीन वडमारे यांनी केली.