
बीड दि.१७ (प्रतिनिधी):- येथील नगर पालिकेचे इंजि. फारोकी अखिल अहमद यांच्यावर नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक कैलाश शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. लाच घेतल्या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती. त्यामध्ये त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील झाली होती. त्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी ही कारवाई केली आहे.बीड नगर पालिकेतील स्थापत्य अभियंता (अतिरिक्त पदभार सहाय्यक नगर रचनाकार) यांना आणि त्यांचे मदतनीस असलेले खाजगी इसम किशोर खुरमुरे यांच्याविरुद्ध बांधकाम परवाना देण्यासाठी ९ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोघांना अटकही झाली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक कैलाश शिंदे यांनी अखिल फारोकी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत ते निलंबीत राहतील, निलंबन कालावधीत फारोकी यांचे मुख्यालय नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय बीड राहील असे आयुक्तांनी आदेशा म्हटले आहे.