पवनचक्की कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेनेकडे लेखी तक्रारी द्याव्यात. मुळूक,गलधर
पवनचक्की वाल्याच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना आक्रमक.

बीड (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यात पवनचक्कीचे जाळे दिवसेंदिवस पसरत असून गुंडगिरी ही वाढत आहे. शेतात पवनचक्की उभारण्यासाठी या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. पवनचक्की कंपनीच्या त्रासाला आणि गुन्हेगारीला वैतागून काही शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पवनचक्की कंपन्यांच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून पवनचक्की कंपनीकडून फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या जिल्हा कार्यालयात लेखी स्वरुपात तक्रारी द्याव्यात असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्निल गलधर यांनी केले आहे.जिल्ह्यात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू असून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला जात नाही. शेतकऱ्यांनी मावेजा मागितल्यास स्थानिक गुंडांकडून धमकावण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच शेतकऱ्यांनी मावेजासाठी पवनचक्कीचे काम अडविले तर कंपनीचे अधिकारी पोलिसांना हाताशी धरुन उलट शेतकऱ्यांनाच जेलमध्ये टाकण्याची धमकी देतात. असा आरोप मुळूक, गलधर यांनी केला आहे. पवनचक्कीवाल्यांकडून शेतकऱ्यांची रितसर परवानगी न घेता त्यांच्या शेतामधून तार ओढण्याचे काम केले जात आहे. पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला वैतागून सुलतानपूर येथील एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर नाईकवाडे नामक शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रकार घडला आहे. ज्या गावात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे त्या गावात या कंपनीकडून स्थानिक गुंडांना हाताशी धरून शेतकऱ्यांना धमकवण्याचे व फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. पवनचक्की कंपनीच्या गुन्हेगारीला वैतागून शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. आता पवनचक्की कंपनीच्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी बीड जिल्हा शिवसेना आक्रमक झाली आहे. पवन चक्की कंपनीकडून जिल्ह्यात ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांसह शिवसेना बीड जिल्हा कार्यालय बार्शी रोड येथे लेखी स्वरूपात तक्रार दाखल कराव्यात असे आवाहन जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्निल गलधर यांनी केले आहे.