
*वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये… संतोष देशमुख हत्याप्रकरणावर संदीप क्षीरसागरांच्या भाषणाने विधानसभा हलवून सोडली*
मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी दिवसा ढवळ्या अपहरण करून हत्या करण्यात आली होती.या हत्येमागील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच आहे म्हणून याला अटक करावी अशी मागणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात संदीप क्षीरसागर यांनी केली. वाल्मीक कराडला जर अटक झाली नाही तर बीड जिल्ह्यात भीषण परिस्थिती उद्भभवेल, असा इशारा बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिला. त्यांनी गुरुवारी विधानसभेत संतोष देशमुख हत्याप्रकरणातील धक्कादायक तपशील सभागृहात मांडला. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड या व्यक्तीचा सहभाग आहे. मस्साजोग गावातील लोकांनी मला याबाबत माहिती दिली. 6 डिसेंबर, 9 डिसेंबर आणि 11 डिसेंबर या तीन दिवसांचे कॉल रेकॉर्ड पोलिसांनी तपासले तर पूर्ण गणित लक्षात येईल. संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस ठाणे जाळून टाकू, असे मस्साजोगचे गावकरी म्हणत होते. मात्र, मी त्यांना थांबवले. वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यात भीषण परिस्थिती निर्माण होईल. जिल्ह्यातील लोक रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहेत. सरकारने वेळीच पावलं न उचलल्यास कायदा-सुव्यवस्था सांभाळणे अवघड होऊन जाईल, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले.