
बीडमध्ये पोलिसांची ॲक्शन सुरू… हवेत गोळीबार करणाऱ्या धनुभाऊंच्या कार्यकर्त्यावर गुन्हा.
बीड : हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यावर अखेर बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आज सकाळीच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी हवेत गोळीबार करणाऱ्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली होती.एबीपी माझाने याबाबतचे व्हिडिओ दाखवल्यानंतर आणि सोशल मीडियातून हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर पोलिसांनी कारवाई करत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याने हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ शेअर करत बीडमधील गुंडागर्दी व दहशतीवरुन प्रश्न उपस्थित केले होते. बीड जिल्ह्यात १२२२ शस्त्र परवाने असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. एवढा मोठा पर प्रमाणात बंदुकीचे परवाने का दिले व कोणाच्या शिफारशीवर देण्यात आले? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी उपस्थित केला. हवेत गोळीबार करताना व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. विशेष म्हणजे, बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हेही अॅक्शन मोडमध्ये असून लवकरच संतोष देशमुख प्रकरणातील उर्वरीत आरोपीला अटक करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय