
बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांची नियुक्ती झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने आज बीड शहरातील पात्रुड गल्लीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हातभट्टी दारु अड्ड्यावर बीड शहर पोलीस ठाणे डीबी पथकाने छापा मारुन दारु बनविण्याचे रसायन आणि तयार दारु असा एकूण ३३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन एकावर गुन्हा दाखल केला. आरोपी फरार आहे.शहरातील पात्रुडगल्ली येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टी दारु तयार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाली. याची माहिती त्यांनी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांना दिली. त्यांनी एक पथक तयार करुन छापा मारण्यास सांगितले, या सूचनेवरून डीबी पथक आणि इतर कर्मचाऱ्यांनी माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा टाकला असता यावेळी येथे चुलीवर दारु तयार करण्यात येत असल्याचे तसेच विक्री सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांना पहाताच दारु बनविणारा आणि ग्राहकांनी पळ काढला. या जागेची पाहणी केली असता येथे दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन किंमत ३१ हजार ८०० आणि तयार दारु किंमत २ हजार असा एकूण ३३ हजार ८०० रुफयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस हवालदार अजिनाथ जगन्नाथ सानप यांच्या फिर्यादीवरून आरोपी राकेश प्रभाकर ऊर्फ गुडबा जाधव रा.पात्रुडगल्ली बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई बीड शहर पोलीस ठाणे डीबी पथक व कर्मचाऱ्यांनी केली.