कोणाचाही बाप येऊ द्या,देशमुख हत्या प्रकरण दाबू देणार नाही…जरांगे पाटील
१६ दिवसानंतरही मुख्य सूत्रधार व आरोपी फरार कसे ?

बीड दि. २५ (प्रतिनिधी): मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर या प्रकरणाची चर्चा चालू आहे. यातील काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत, परंतु अद्यापही प्रमुख आरोपीचा पोलिसांना तपास घेता येईना. या हत्यामागे मुख्य सूत्रधार सापडून त्यांना शिक्षा होईपर्यंत आपण पाठपुरावा करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.कोणाचाही बाप येऊ द्या मस्साजोग प्रकरण मी दबू देणार नाही, देशमुख कुटुंबियास न्याय मिळवून देणार असे सांगत २८ डिसेंबरच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या हत्येच्या विरोधात अगदी पहिल्या दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आवाज उठविला आहे. या प्रकरणावर पुन्हा एकदा त्यांनी ताशेरे ओढले आहेत. येत्या २८ डिसेंबर रोजी बीडमधील मोर्चात स्वतः जरांगे पाटील सहभागी होणार आहेत. हे प्रकरण मी दबू देणार नाही, कोणाचाही बाप येऊ द्या, मी देशमुख कुटुंबियास जो पर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे स्पष्टपणे बोलून दाखविले. कोण कसा तपास करतोय हे आम्हाला माहित नाही, मात्र आम्हाला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्यायचा आहे. आज संपूर्ण बीड जिल्हा देशमुख कुटुंबियांच्या पाठिशी आहे. या प्रकरणात जर सरकार आणि प्रशासनाने हयगय केली तर बीडची जनता काय आहे हे आम्ही सरकारला दाखवून देऊ, आमच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशाराही जरांगे पाटील यांनी बोलून दाखविला.