खंडणी प्रकरणातील आरोपीच्या कोठडीतील मुक्काम वाढला !
देशमुख हत्या प्रकरणातील ४ आरोपी अद्यापही फरारच.

केज : तालुक्यातील मस्साजोग येथील १५ एकर जमिनीवर विस्तारलेल्या आवादा पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयांची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार पवनचक्की अधिकाऱ्याने दिल्याने या आरोपाखाली सीआयडीच्या ताब्यात असलेल्या विष्णू चाटे याला न्यायालयाने पुन्हा ११ दिवसांची वाढीव पोलिस कोठडी शुक्रवारी दिली आहे. त्याचा कोठडीतील मुक्काम वाढत चालला आहे. असे असले तरी त्याच्याकडून तपासात फारशी गती मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. तर सीआयडीचे अधिकारीही यावर मौन बाळगून आहेत.आवादा एनर्जी कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी वाल्मीक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरुद्ध २ कोटींची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी केज पोलिसांत ११ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान गुन्हा नोंद करण्यात आला होता. दरम्यान, १८ डिसेंबर रोजी विष्णू चाटे याला बीड परिसरात अटक करून १९ डिसेंबर रोजी त्याला केज येथील अप्पर व जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले होते. त्याला ९ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शुक्रवारी याची मुदत संपताच सीआयडीचे पोलिस उपाधीक्षक अनिल गुरव यांनी विष्णू चाटे याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता चाटे याच्या पोलिस कोठडीत आणखीन ११ दिवस वाढ करण्यात आली. गुरव यांनी ही माहिती दिली.सीआयडीकडून तासभर चौकशी सीआयडीचे अपर पोलिस महासंचालक प्रशांत बोरडे हे शुक्रवारी देखील बीडमध्ये आले होते. शहर पोलिस ठाण्यात जाऊन त्यांनी खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या विष्णु चाटे याची तासभर चौकशी केली. यात काय झाले, हे समजू शकले. गुरुवारी देखील बोरडे यांनी आगोदर पोलिस अधीक्षक कार्यालयात आणि नंतर केजच्या विश्रामगहावर जाऊन बैठक घेतली होती.
हत्या प्रकरणातील चार आरोपी मोकाटच !
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्या प्रकरणातील व 2 कोटींची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अद्याप ४ अरोपी मोकाटच आहेत. मस्साजोग येथील सरपंच हत्या, खंडणी व अॅट्रॉसिटी या तीनही गुन्ह्यांचा तपास सध्या सीआयडीचे अधिकारी करीत आहेत.