देशमुख हत्या प्रकरण: धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांचा निशाणा,
देवेंद्र फडणवीसांचे उत्तर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सध्या वाल्मिक कराड यांना सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.वाल्मिक कराड हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाच्या अनुषंगाने विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, “कोणीही दोषी असल्यास कारवाई केली जाईल, मग तो कोणाचाही निकटवर्तीय असो किंवा नाही. या प्रकरणाचा राजकारणासाठी वापर होऊ नये. सरपंचाची हत्या गंभीर आहे, आणि समाजात सुधारणा होण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.”
हप्ते वसुली करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत
फडणवीस यांनी पुढे सांगितले की, “सरकार आणि पोलीस यंत्रणा पूर्ण शक्तीनिशी कारवाई करत आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, दादागिरी आणि हप्ते वसुली करणाऱ्यांवर जरब बसवण्यासाठी योग्य पावले उचलली जातील.”सरकारच्या या भूमिकेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर राजकीय तापमान वाढले असून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणखी तीव्र केली आहे.