बस चालकाला चक्कर आल्याने बसची दुचाकी,चारचकीला धडक.
धारूर मधील घटना,सुदैवाने जीवितहानी नाही.

धारूर आगारातून निघालेली बस चालकाचा शुगर कमी झाल्यामुळे बस चालकाला चक्कर आली.त्यामुळे नियंत्रण सुटून रस्त्यालगत उभ्या असलेल्या तीन दुचाकीसह एका चारचाकी जीपला पाठीमागून धडक दिली. अपघात झाल्याची ही घटना तेलगाव रोड, धारूर येथे घडली. बसचालक बेशुद्ध झाल्यामुळे त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर पुढील उपचारासाठी स्वराती रुग्णालय अंबाजोगाई येथे हलवले आहे.धारूर आगाराची बस (एमएच. २० बीएल. २९३०) ही माजलगाव येथून २५ प्रवासी घेऊन चालक शिवशंकर आकूसकर हे धारूर येथे येत होते. बसने शहरात प्रवेश केल्यानंतर आंबेडकर चौकापासून हाकेच्या अंतरावर कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयाच्या समोर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तीन दुचाकीला सुरुवातीला धडक देऊन लगतच उभ्या असलेल्या चारचाकी गाडीला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुचाकीमध्ये एक स्कूटी, एक मोटारसायकल व बुलेट गाडीचा समावेश होता. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघात झाल्यानंतर चालक शिवशंकर आकुसकर (५५) हे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.