ताज्या घडामोडी

वाल्मीक कराडवर ३०२,मोक्का लावण्यासाठी देशमुख कुटुंबियाचे टॉवर चढून आंदोलन.

हत्येतील एक आरोपी अद्यापही फरार मस्साजोग ग्रामस्थ आक्रमक.

 

बीड दि. १२ (प्रतिनिधी):-मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या हत्येला महिना उलटून गेला आहे. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असून, वातावरण चांगलंच तापलं आहे.यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असून या प्रकरणातील आरोर्पीना मोक्का लावण्यात आला आहे. मात्र यातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावण्यात यावा मागणी देशमुख कुटुंबीय करत आहेत,वाल्मीक कराड सध्या सीआयडी कोठडीत आहे, मात्र त्याच्यावर मोक्का न लावण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले आहेत.आज सकाळी ११ वाजता ग्रामस्थांच्या वतीनं टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येणार आहे, तर १४ जानेवारीला मकर संक्रातीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करत आहेत. या आंदोलनात मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे मस्साजोगला काही वेळात दाखल होणार आहेत.

धनंजय देशमुख काय म्हणाले?

मस्साजोगच्या गावकऱ्यांची काय भूमिका आहे ते त्यांचं ठरवतील. मात्र, माझी भूमिका मी स्पष्ट करणार आहे. आज ३५ दिवस झाले आहेत. गेल्या ३५ दिवसांत आम्ही सर्व यंत्रणा ते मुख्यमंत्री यांच्यावर विश्वास ठेवला. मला कालपर्यंत अपेक्षित होतं की मला तपासाबाबत संपूर्ण माहिती मिळेल. सर्व सीडीआर निघालेत का? जर पुरावे नष्ट झाल्यानंतर मला सर्व समजणार असेल तर मग माझ्या भावाला न्याय मागण्यात अर्थ काय? मी प्रत्येकवेळी विश्वास ठेवला. मात्र, आता मी काही भूमिका घेणार आहे. ती भूमिका मी पूर्ण गांभीर्याने आणि विचार करून घेत आहे. मुख्यमंत्री आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व यंत्रणेला मी पुरावे एफआयआर प्रमाणे दिले आहेत. मी वेळोवेळी सांगतोय की खंडणी ते खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि खंडणी ते खून या प्रकरणाचं काय कनेक्शन आहे? सीआयडीने ज्या दिवशी पहिली सुनावणी झाली होती तेव्हाच स्पष्ट केलं होतं.


… जर ३०२ चा गुन्हा घेतला नाही तर

आता माझी भूमिका अशी आहे की, आरोपीला मकोका अंतर्गत आणि ३०२ च्या गुन्ह्यात जर घेतलं नाही तर आज १० वाजल्यापासून माझं आणि माझ्या कुटुंबाचं वैयक्तिक आंदोलन मोबाईल टॉवर करणार आहोत. त्या टॉवरवर जाऊन मी स्वतःला संपवून घेतो. याचं कारण आहे की हे आरोपी जर सोडले तर उद्या हे माझाही खून करतील. मग माझ्या कुटुंबातील न्याय मागणारा कोणी नसेल, मला भिती आहे. हे खंडणी ते खून हे कनेक्शन आहे, हे खंडणीतूनच झालेलं आहे. मला जर न्याय मिळत नसेल, माझ्या कुटुंबाला सर्व माहितीपासून दूर ठेवलं जात असेल तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. मी उद्या १० वाजता माझ्या आंदोलनाला सुरुवात करणार आहे. मी टॉवर जाऊन स्वतःला संपवून घेणार आहे, कारण मला या सगळ्यांपासून भिती आहे. तपास यंत्रणा जर आम्हाला माहिती देत नसेल आणि कोणालातरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल तर आमच्या न्याय मागण्याला काहीही अर्थ नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

आनंद वीर

पत्रकार आणि पार्श्वभूमी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी बातम्या व जाहिरातीसाठी थेट संपर्क करा - मो.: 8623880100 | ईमेल: veeranand478@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button