जिल्हाधिकारी पाठक यांनी केलेल्या कार्यवाही विरोधात टिप्पर चालक हायकोर्टात
खताची वाहतूक करणाऱ्या नागरिकांवर अन्यायकारक कारवाई

बीड: एकीकडे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचे शासनाचे धोरण असताना, दुसरीकडे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खतांची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीवर अन्यायकारक कारवाई करण्यात आली आहे.सदर प्रकरणात ॲड विशाल कदम यांच्या मार्फत याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात धाव घेतली असून सदरील प्रकरणावर आज दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी 03 वाजता विशेष सुनावणी होणार आहे.
याचिकाकर्ता, बाबासाहेब एकनाथ मस्के जे आपल्या वाहनाद्वारे शेणखत, गांडूळ खत, कोंबडी खत यांसारख्या सेंद्रिय खतांची वाहतूक अत्यंत अल्प दरात शेतकऱ्यांसाठी करतात, त्यांच्यावर वाळूचे अवैध उत्खनन आणि वाहतूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. मात्र, सदरील नोटिशीमध्ये कोणताही पुरावा जोडलेला नाही, तसेच बीड किंवा गेवराई तालुक्यातील कोणत्याही तहसीलदार अथवा मंडळ अधिकाऱ्यांनी अशी कोणतीही तक्रार केली नसल्याचे समोर आले आहे.
याचिकाकर्त्याने सांगितले की, “मी नेहमीच नियमांचे पालन करूनच सेंद्रिय खतांची वाहतूक करतो. ही वाहतूक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आहे, जेणेकरून त्यांच्या जमिनींना नैसर्गिक समृद्धी मिळू शकेल. मात्र, कोणतीही चौकशी न करता किंवा पुरावे न देता माझ्यावर खोटा आरोप ठेवून कारवाई करण्यात आली आहे. ही बाब माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला मोठ्या संकटात टाकणारी आहे.”
तथाकथित नोटिशीत नमूद केलेल्या तारखांना याचिकाकर्ता हा सेंद्रिय खतांचीच वाहतूक करत होता. कोणतेही अवैध उत्खनन अथवा वाहतूक यावेळी झालेली नाही. या प्रकरणात संबंधित अधिकार्यांनी महाराष्ट्र भू महसूल कायदा, १९६६ नुसार आवश्यक कार्यवाही केली नसल्याचे उघड झाले आहे.
“सदर प्रकरणात मला कोणतीही पूर्वसूचना दिली गेली नाही किंवा माझ्या बाजूने कोणतेही म्हणणे मांडण्याची संधीही दिली गेली नाही. ही कारवाई नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना धक्का पोहोचवणारी असून ती माझ्या हक्कांचे उल्लंघन करणारी आहे,” असे याचिकाकर्त्याने भावनिक शब्दांत सांगितले.
या प्रकरणामुळे शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आता याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली असून, हा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. सदर प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्याची विनंती ॲड विशाल कदम यांनी न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाकडे केली असता त्यांची मागणी मंजूर करून सदरील प्रकरणावर तातडीने आज दुपारी 13 जानेवारी 2025 रोजी 03 वाजता विशेष सुनावणी ठेवण्यात आलेली आहे.
शासनाने अशा प्रकारच्या प्रकरणांवर संवेदनशीलपणे विचार करून, वास्तविकता तपासून योग्य ती कारवाई करावी, अशी शेतकऱ्यांचीही अपेक्षा आहे.