
शिरूर कासार(प्रतिनिधी)
लोकसहभागातून मोठे काम सहज होते. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी निधी, श्रम, साहित्य लोकसहभागाने उभारता येते. त्यातूनच शैक्षणिक विकास साधावा असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांनी शिरूरकासार येथे दि.१० रोजी केंद्रीय शिक्षण परिषदेत बोलताना केले. अध्यक्षस्थानी गो.ना. खेडकर तर गटशिक्षणाधिकारी जमीर शेख, अर्जुन बडे, सुरेश मिसाळ, भरत ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
बालकांचा भाषिक विकास होण्यासाठी अध्यापनात शब्दप्रयोजन महत्वाचे असते असे सांगून डॉ. जाधव यांनी अटर का पटर, पिल्लू, बाप रगत ओकतो या कविता सादर केल्या.
बाप रगत ओकतो
दुष्काळ पोटात घेतो
म्हशी कळप वळीतो
खाट्या भाकड काळात
या ओळींना उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘हाय- हाय केलं त् गुय-गुय कयतं’ हे पिल्लू नावाचे बोबडगीत सादर केले. तसेच निपुण भारत उपक्रमात माता पालक संघाचा लोकसहभाग घ्यावा. मुलांना कृतीयुक्त शैक्षणिक अध्ययन अनुभव द्यावेत. ते चिरकाल टिकतात असे सांगत गटशिक्षणाधिकारी जमीर शेख यांनी शैक्षणिक गुणवत्ता विकासात शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे सांगितले. राजू दहिफळे यांनी मासिक नियोजन, सुभाष कंठाळे यांनी मुल्यमापन संकल्पना तर उमाकांत रंधवे यांनी शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि त्याचा अध्यापनात वापर याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बाळासाहेब सिरसाठ, प्रशांत गाडेकर, आप्पासाहेब शिंदे, अनिल घुले, बबन तांबे, अनिल सानप, विकास कुलथे, दिपक केदार आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.