
अंबाजोगाई: शहरातील मोरेवाडी परिसरातील माऊली नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नवनाथ कदम यांच्या सिद्धेश्वर या मुलावर रेणापूर तालुक्यातील गोविंद नगर येथील गणेश पंडित चव्हाण या युवकाने गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
ही घटना शहरात खळबळ निर्माण करणारी ठरली आहे. याआधी संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्हा, राज्य आणि देशभरात खळबळ माजवली होती. तसेच अंबाजोगाईतील व्यापारी सुजित सोनी यांच्यावर हल्ला करून लुटण्याची घटना अद्याप ताजी असतानाच, हा गोळीबार झाल्याने शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आरोपी गणेश पंडित चव्हाण याला ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास अंबाजोगाई पोलिस करत आहेत.
शहरातील अशा घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाने त्वरीत या घटनांवर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.