
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज दिनांक २५ जानेवारी पासून उपोषणास बसणार असल्याचा इशारा सरकारला दिला होती. विधानसभा निवडणुकीमध्ये मराठ्यांनी सरकारला भरभरून मते दिली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लक्ष देतील, मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत. आमच्या मागण्या सरकारला माहीत आहेत. मला समाजाची काळजी असल्याने मी पुन्हा उपोषण करीत आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी ते आजपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसत आहेत.ओबीसीतून आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी 15 महिन्यांत त्यांचे सातव्यांदा उपोषण आहे. जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण द्या, गॅझेट लागू करा, शिंदे समितीचे काम सुरू करा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, आम्हाला संघर्ष करावा लागेल. समाज मला साथ देतो, समाज मला कधीही उघड्यावर पडू देत नाही. या आमरण उपोषणाला देखील मोठा प्रतिसाद मिळेल, आरक्षण सगळ्यांना हवे आहे. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होईल. खरे जातीयवादी कोण हे आता समजेल, असे जरांगे यांनी सांगितले. शिंदे समिती नोंदी का शोधत नाही, व्हॅलिडिटी का देत नाही, हे आता कळेल. आज सकाळी 10 वाजता उपोषण सुरू करणार, ज्यांना उपोषणात बसायचं ते बसतील इतरांनी पाठिंबा द्यावा, असे जरांगे पाटील म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण दबणार नाही कुणाचाही बाप आला तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण दबू देणार नाही. सूर्यवंशी हत्या प्रकरण, देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतील मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.