
बीड येथील चर्चेत असलेल्या अक्षय आठवलेवर विविध प्रकारचे १९ गंभीर गुन्हे दाखल असल्याने, याची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी दणका देत अक्षय आठवले टोळीवर आज मोक्का अंतर्गत कारवाई केली. यामुळे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांमध्ये एक प्रकारे दहशत निर्माण झाली आहे. बीड जिल्हयातील गुन्हेगारीचे व गुंडगिरीचे समूळ उच्चाटन करण्याचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून मोक्का, एमपीडीए व कलम ५५,५६,५७ मपोका अन्वये बऱ्याच गुन्हेगारांवर व गुंडावर कारवाईचा धडाका पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली बीड पोलिसांनी सुरु ठेवला आहे.
जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी जिल्ह्यात चोऱ्या, दरोडे, घरफोड्या, खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, बलात्कार, जुलुमाने घेणे, पळवुन नेणे, खंडणी मागणे या व अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द ठोस कारवाई करण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलीस गुन्हेगारांवर करडी नजर ठेऊन आहेत. याच अंतर्गत प्रकाश आंबेडकर नगर येथे प्लॉटच्या वादातून घरात घुसून गोळीबार केल्याची घटना १३ डिसेंबर २०२४ घडली होती. याप्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा प्रथम दर्शनी तपास पोनि अशोक मुदीराज पो.स्टे. पेठ बीड व त्यानंतर पो.नि. उस्मान शेख, स्थागुशा बीड यांनी केला आहे.
सदर गुन्हयाच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने बाराकाईने शोध घेऊन सदर गुन्हयातील आरोपी अक्षय शामराव आठवले (वय २८ वर्ष) रा. मंत्री कॉलनी, माळीवेस, मनिष ऊर्फ प्रतिक प्रकाश क्षीरसागर (वय २५ वर्ष) रा. स्वराज नगर बीड, ओंकार सिध्दार्थ सवई (वय २५ वर्ष) रा. स्नेह नगर, बीड यांना दि. १९/१२/२०२४ रोजी १३.२८ वा. अटक करुन गुन्ह्यात वापरलेली बर्गमॅन स्कूटी व पिस्टल (गावठीकट्टा) जप्त केला आहे. तसेच प्रसाद मोतीराम धिवार यास दिनांक १३/१२/२०२४ रोजी ११.५२ वा. अटक केले आहे.
सदर गुन्हा हा एकूण सहा आरोपींनी केला असल्याचे तपासात उघड झाले. तसेच सदर टोळी ने आजपर्यंत संघटीतरीत्या बीड व इतर जिल्ह्यात १९ पेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. ज्यात खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरीचोरी करणे, अवैधशस्त्र (गावठीकट्टा) बाळगण, अवैधरीत्या अग्नीशस्त्रांची विक्री करणे, मारामारी करणे, अग्नीशस्त्रे चालविणे, पोलिसांच्या कायदेशीर रखवालीतून जिवघेणा हल्ला करुन पळून जाणे, सरकारी कामात अडथळा आणने, खंडणी मागणे या सारखे गंभीरस्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. प्रस्तावात १९ गुन्हे विचारात घेण्यात आले. त्यापैकी १६ गुन्हयांची दखल न्यायालयाने घेतलेली असुन ०३ गुन्हे पोलीस तपासावर आहेत.
सदर टोळीने हा गुन्हा करण्यापुर्वी पो.स्टे. शिवाजीनगर, बीड ग्रामीण, केज, पेठ बीड आणि बीड शहर हद्दीत गुन्हे केले आहेत. बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचने वरुन सदर प्रकरणांत तपासी अधिकारी पोनि उस्मान शेख, स्थागुशा, बीड यांनी अपर पोलीस अधीक्षक बीड यांचे मार्गदर्शनाखाली सदर टोळी विरुध्द मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव तयार करुन दिनांक १८/०१/२०२५ रोजी पोलीस अधीक्षकांना सादर केला होता. पोलीस अधिक्षक, नवनीत कॉवत यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रस्ताव आपले शिफारशी सह मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, औरंगाबाद परिक्षेत्र औरंगाबाद यांना सादर केला होता. दिनांक २७/०१/२०२५ रोजी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करुन नमूद संदर्भीय गुन्हयांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ मधील कलमांचा अंतर्भाव करण्याची परवानगी दिल्याने पोलीस अधीक्षक बीड यांनी सदर प्रकरणांचा पुढील तपास विश्वंभर गोल्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड यांचेकडे दिला आहे.
व मोक्का कायदयाचे कलम ३(१) (ळळ), ३(२), ३ (४) समाविष्ठ करणे बाबत आदेशीत केले आहे. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी बीड हे सदर गुन्हयाचा पुढील तपास करीत आहेत. सदर प्रकरणांत चार आरोपी अटक असून दोन फरार आहे पोलीस त्यांच्या शोधात आहेत.