उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरेश धस यांची भेट नाकारली.
मागील पाच वर्षातील कामाची चौकशी करावी.तक्रार करून पुरावे देणार...आ.सुरेश धस

बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मागे हात धुवून लागलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट नाकारल्याची चर्चा आहे. यामुळे ते अजितपवारांची भेट न घेताच पुण्याहून बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील एकामागून एक प्रकरणं समोर येत आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस, मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे पदाधिकारी यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण, पीक विमा घोटाळा, हार्वेस्टर घोटाळा आणि इतर अनेक घोटाळे चव्हाट्यावर आले. तर आता जिल्हा नियोजन समितीमधील विविध कामात भ्रष्टाचाराचे पेव फुटल्याचा आरोप आमदार धस यांनी केला. यासंदर्भातील तक्रार आणि खुलासा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून करणार होते. पण दादांनी त्यांना भेट टाळल्याचे समोर येत आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भेटून सुरेश धस हे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीची च्या कामांमध्ये भ्रष्टाचार हा कसा झाला आहे याची माहिती देणार होते. उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना भेटीची वेळ दिली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरेश धस यांनी भेट टाळली.
सुरेश धस हे आपल्या पीए च्या माध्यमातून अजित पवार यांच्या कार्यालयाला पत्र पाठवणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुरेश धस यांना आज भेटीची वेळ अजित पवार यांनी दिली नसल्यामुळे सुरेश धस हे बीडकडे आज सकाळी रवाना झाले आहेत.
अजित पवार यांची भेट घेऊन आज सुरेश धस २०१९ पासून ते २०२४ पर्यंतच्या जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करा अशी मागणी करणार होते. यासंदर्भातील पत्र आज सुरेश धस हे अजित पवार यांना देणार होते. सुत्रांच्या माहितीनुसार अजित पवारांची वेळ न मिळाल्याने सुरेश धस बीडला निघून गेलेसध्या अजित पवार यांनी चौकशी समितीला केवळ २०२३-२४ या आर्थिक वर्षाची जिल्हा नियोजन विभागाच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. धनंजय मुंडे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार जिल्हा नियोजन विभागाच्या कामात झाल्याचा गंभीर आरोप आमदार धस यांनी केला आहे. विशेष म्हणजे धस यांच्या वतीने आधीच ७२ कोटी रुपयांची बोगस बिले पुरावा म्हणून अजित पवारांना देण्यात आली आहेत. आता या नवीन घडामोडींमुळे भ्रष्टाचाराला खो मिळतो की याप्रकरणात धडक कारवाई होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागेल आहे. मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार सुरेश धस यांची भेट नाकारल्याने भ्रष्टाचार करणाऱ्याला पाठीशी घालत आहेत का? असा सवाल सर्वसामान्य बीड जिल्ह्यातील जनतेला पडला आहे.