बार्शी नाका,ईमामपूर रोडवर रेल्वे स्थानक होणार.
केंद्रीय रेल्वेमंत्री दिले सर्वेक्षणाचे निर्देश,रेल्वे संघर्ष समितीच्या मागणीला यश.

बीड (प्रतिनिधी)- बीड शहरातील बार्शी नाका इमामपुर रोडवरील रेल्वे थांबा व्हावा यासाठी बीड रेल्वे कृती समितीने मागणी केली होती.या मागणीचा विचार करून नव्या रेल्वे स्टेशनसंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहेत. खा. बजरंगबप्पा सोनवणे यांनी दिल्लीत केलेला पाठपुरावा आणि बीडच्या बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या लढ्याला या माध्यमातून मोठे यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हा विषय मनावर घेतला हेच खुप मोठे यश असुन सर्वेक्षणानंतर निश्चितच बार्शी नाका इमामपुर रोडवर नव्या रेल्वे स्टेशनला मंजुरी मिळेल.
बीड जिल्ह्याचे खा. बजरंगबप्पा सोनवणे यांनी बार्शी नाका इमामपुर रोडवरील रेल्वे स्टेशन संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दि. ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्र दिले होते. या ठिकाणी रेल्वे थांबा किती आवश्यक आहे हे देखील केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना अधोरेखित केले होते. अखेर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने बजरंगबप्पांच्या मागणीची आणि बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समितीच्या लढ्याची दखल घेतली.
बार्शी नाका येथे नवीन रेल्वे स्टेशन निर्मितीच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्याचे निर्देश रेल्वे विभागाला दिले आहेत. दरम्यान बीड शहर वासियांसह आजूबाजूच्या तालुक्यांच्या दृष्टीने बार्शी नाका इमामपुर रोडवरील रेल्वे स्टेशन सोयीचे असल्याचा मुद्दा उपस्थित करत माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष खुर्शीद आलम यांनी सर्वांना एकत्रित करून बार्शी नाका रेल्वे स्टेशन संघर्ष समिती स्थापन केली. यासाठी स्वतः पुढाकार घेऊन बैठक आयोजीत केली. या बैठकीत सर्वानूमते संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी पार्श्वभूमीचे संपादक गंमत भंडारी यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर संघर्ष समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी रेल्वे स्थानकाचा मुद्दा प्राधान्याने पुढे केला होता. खा. बजरंगबप्पांना सोबत घेऊन बैठक घेतली. एवढेच नव्हे तर खा. बजरंगबप्पांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांसह बार्शी नाका इमामपुर रोडवरील नियोजीत रेल्वे थांब्याच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी देखील केली होती. अखेर रेल्वे कृती समितीच्या लढ्याला मोठे यश आले आहे.