मांजरसुंबा,कोळवाडी घाटात पाच वाहने एकमेकाला धडकली.
ट्रकमधील हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले.

बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस अपघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, आज दिनांक १६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मांजरसुंबा कोळवाडी घाटाच्या पायथ्याशी पाच वाहने एकमेकाला धडकली.
आज सायंकाळी मांजरसुंबा कडून बीड कडे हरभरा घेऊन येणारा कंटेनर कोळवाडी घाटात अचानक समोरील वाहनाने ब्रेक लावल्याने ट्रक,आयशर टेम्पो, अशोक लेलँड, कार,ऑटो रिक्षा ही वाहने एकमेकाला धडकुण विचित्र अपघात झाला. या अपघातात चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मालवाहू ट्रक मधील हरभरा पोते रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी होऊन वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, तर हरभरा रस्त्यावर पडल्याने दुचाकीस्वार घसरून पडू लागले होते. या अपघाताची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळतात तात्काळ अपघात स्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली व रस्त्यावरील हरभरा हटवण्याचे काम सुरू केले.तर काही लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन हरभऱ्याचे पोते लांबवल्याची माहिती मिळत आहे.