मस्साजोग ग्रामस्थांचे न्यायासाठी अन्नत्याग आंदोलनाचा इशारा.
मागण्या मान्य न झाल्यास २५ फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन.

केज मस्साजोग येथील सरपंच कै.संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला 72 दिवस पूर्ण होऊनही मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात आली नाही. यातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी यासह इतर मागण्यांची पूर्तता न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी दिनांक 25 फेब्रुवारी 2025 पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.गावकऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाला दिलेल्या निवेदनात प्रशासनाकडे सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये –
1. पि.आय. महाजन व पि.एस.आय. राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे.
2. फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करणे.
3. काही पोलीस अधिकाऱ्यांचे सी.डी.आर. तपासून त्यांना सहआरोपी करणे.
4. आरोपींना मदत करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणे.
5. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करणे.
6. सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे.
7. संतोष देशमुख यांच्या पार्थिवाबाबत पोलिसांनी घेतलेल्या संशयास्पद निर्णयाची चौकशी करणे.
या मागण्या 24 फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास गावकरी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.