मातृछत्र हरवूनही शिक्षणाची जिद्द: अंत्यविधीनंतर तासाभरातच दहावीच्या परीक्षेला हजर
धामणगाव, ता. कडा (बा. म. पवार यांच्याकडून)

जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, धामणगाव येथे शिक्षण घेत असलेल्या नम्रता राजू मुळे हिने आज दुर्दैवी प्रसंगातही शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. पहाटेच तिची आई साधना राजू मुळे यांचे दुःखद निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली असतानाही नम्रताने मनाचा हिय्या करून सकाळी साडेनऊ वाजता आईच्या अंत्यविधीस उपस्थित राहून तासाभरातच इंदिरा माध्यमिक विद्यालय, धामणगाव येथे सुरू असलेल्या दहावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेला हजेरी लावली.
आईच्या अचानक निधनाने तिच्या डोळ्यांत अश्रू, मनात हळवेपणाचे काहूर आणि हातात परीक्षेचे पेपर… यापेक्षा मोठे दु:ख कोणते असू शकते? एकीकडे परीक्षेचे दडपण, तर दुसरीकडे मातृछत्र हरवल्याचा आभाळासारखा मोठा आघात. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आज सकाळी मयत साधना मुळे यांना उपचारासाठी अहिल्यानगर येथे दाखल करायचे होते. मात्र, काळाने त्यासाठी वेळ दिला नाही. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पती राजू मुळे, मुलगा यश मुळे (बारावी परीक्षा देत आहे), मुलगी नम्रता मुळे असा परिवार या कठीण प्रसंगातून जात आहे.
या परिस्थितीत शिक्षण विभागाकडूनही मानसिक आधार देण्यात आला. आष्टीचे गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव साहेब आणि केंद्र संचालक राजू गरजे सर यांनी स्वतः परीक्षा केंद्रावर भेट देऊन नम्रताला सांत्वन केले व मानसिक आधार दिला. त्यांच्या सहकार्यामुळे ती परीक्षा देण्यास सक्षम झाली.
शिक्षणाप्रती असलेली तिची निष्ठा आणि मानसिक धैर्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.