राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना मारहाण.
सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्ट पण तक्रार दाखल नाही.

बीड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना सोमवारी मारहाण झाल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. तर व्हिडिओ आणि काही फोटोही फिरत आहेत. पण या बाबतीत अद्याप याबाबत तक्रार करण्यात आलेली नाही. ही मारहाण का झाली आणि कोणी केली ? याबाबत काहीही स्पष्ट नाही.
अंबाजोगाई येथे पत्रकार परिषद घेऊन त्यात त्यांनी धनंजय मुंडे यांची बदनामी केली तर शांत बसणार नाही असा इशारा दिला होता. यामुळे ही मारहाण झाली असावी अशी चर्चा सुरू आहे. बीड जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या उजवा हात समजला जाणार कराड जेलमध्ये आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांची नाहाक बदनामी केली तर शांत बसणार नाही बदनामी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असा दम दिला होता. यानंतर राजेश्वर चव्हाण यांच्या विरुद्ध संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती. दरम्यान सोमवारी ते नेहमी प्रमाणे हातोला गावातून बाहेर निघताच काही तरुणांनी त्यांचे वाहन थांबविले आणि त्यांना बाहेर ओढून मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत चव्हाण यांनी तक्रार दिलेली नाही. परंतु सोशल मीडियावर त्यांना मारहाण झाल्याच्या पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या आहेत.