
बीड दि.५ (प्रतिनिधी) :- बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात लाचखोरी वाढल्याचे बुधवारी झालेल्या एका मोठ्या कारवाईतून समोर आले आहे. तक्रारदाराच्या आईच्या नावे असलेले घर भाडेतत्वावर वनपरिक्षेत्र अधिकारी पाटोदा यांना देण्यात येणाऱ्या इमारतीचे भाडे पुनर्मुल्यांकन अहवाल प्रमाणपत्र देण्यासाठी बांधकाम विभागातील शाखा अभियंता अर्जुन राख, कनिष्ठ अभियंता रोहित गिरी आणि शिपाई शेख रफीक या तिघांनी फक्त ९ हजारासाठी आपलं तोंड काळं केलं. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे.इमारतीचे भाडे पुनर्मुल्यांकन अहवाल प्रमाणपत्र देण्यासाठी शाखा अभियंता अर्जुन आश्रुबा राख (वय ५५) रा. थेरला ता. पाटोदा यांनी स्वतःसाठी दोन हजार रुपये आणि कनिष्ठ अभियंता रोहित बाबासाहेब गिरी (वय २४वर्षे), रा.माळापुरी ता. बीड यांच्यासाठी ३ हजार रुपये लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दि.४ मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी केली. त्यानंतर दि.५ मार्च रोजी तक्रारदाराकडून ९ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम कनिष्ठ अभियंता गिरी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातीलच शिपाई शेख रफीक इस्माईल (वय ४८ वर्षे), रा. केज याच्याकडे देण्यास सांगितली. त्यावरुन शेख यास तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी शेखची अंगझडती घेतली असता मोबाईल आढळून आला तर कनिष्ठ अभियंता रोहित गिरी याच्या अंगझडतीमध्ये मोबाईलसह १५८० रुपयांची रोख रक्कम, घडी व इतर मुद्देमाल मिळून आला. या प्रकरणातील शाखा अभियंता अर्जुन राख, कनिष्ठ अभियंता रोहित गिरी आणि शिपाई शेख रफीक यांच्याविरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून घरांची झडती देखील सुरु आहे. सदरील कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, बीडचे पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बगाटे, पोलीस अंमलदार श्रीराम गिराम, सहाय्यक फौजदार सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अमोल खरसाडे आणि चालक अंबादास पुरी यांनी केली.