
बीड शहरातील नाळवंडी नाका भागातील इमारतीचे बांधकाम मजूर म्हणून काम करीत असलेला तरुण चौथ्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी होऊन ठार झाल्याची घटना आज सकाळी ७:३० वाजता पेठ बीड भागातील जुना इदगाह परिसरात घडली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. शेख उमर शेख शाहेद (वय १९ वर्ष) रा. मोहमदिया कॉलनी, बीड असे मयत मजुराचे नाव आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने व रमजान महिना सुरू असल्याने अनेकांना रोजा असतो यामुळे बांधकाम मिस्त्री हे सध्या सकाळी ७वाजताच कामाला सुरुवात करीत आहेत. पेठ बीड भागातील जुना इदगाह नाका परिसरात बांधकाम सुरू झाले. ७:३० घ्या सुमारास काम करीत असताना शेख उमर याचा तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली पडला, यामुळे त्याला डोक्याला व इतर ठिकाणी गंभीर जखमी झाला. याच अवस्थेत त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात नेहण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी करुन मृत्यू झाल्याचे घोषित केले. अवघ्या १९ वर्षात आपल्या कुटुंबाचा आधार बनत मजुरी करणारा तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याचे हळहळ व्यक्त केली जात आहे. या कामगाराच्या वडीलाचे काही वर्षां पूर्वी निधन झाल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी उमरवर होती. कामगाराच्या नातेवाईकांना कामगार कल्याण खात्यातून मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.