जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाचा गुंडाराज.व्हिडिओ पहा.
सुरक्षारक्षकाच्या मारहाणीत पाय फ्रॅक्चर.गुन्हा दाखल.

बीड (प्रतिनीधी) बीड शहरातील शासकीय रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून सुरक्षा रक्षकाने मारहाण करतानाचा व्हिडिओ प्रसार माध्यमावर व्हायरल झाल्याने सुरक्षारक्षका विरोधात संतापाची लाट उसळली असून ही सुरक्षारक्षक आहेत की भक्षक आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या आधी देखील बीड शासकीय रुग्णालयातील सुरक्षारककाविषयी अनेक तक्रारी होत्या.परंतु सदरील कंपनी ही त्या सुरक्षा रक्षकाला पाठीशी घालत असल्याने दिवसेंदिवस सुरक्षारक्षकाचा गुंडाराज वाढत चालला होता.सुरक्षारक्षकाच्या मारहाणीत रिक्षाचालकाच्या पायाचे हाड फ्रॅक्चर झाले असून, त्याने बीड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
वसीम सलीम मिर्झा (वय 37, रा. जालना) असे मारहाणीत जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. वसीम हे पत्नी आणि मुलांना भेटण्यासाठी लातूर येथे गेले होते. परत येताना त्यांच्या डाव्या पायातील लोखंडी रॉडचा त्रास होऊ लागल्याने ते बीडमध्ये उतरले आणि सरकारी रुग्णालयात उपचारासाठी गेले.
रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना बाहेर जाऊन बसण्यास सांगितले. मात्र, प्रकृती अस्वस्थ असल्याने वसीम यांनी बाकावर बसण्याची विनंती केली. यावर सुरक्षारक्षकांनी त्यांची चौकशी केली आणि नंतर त्यांना जबरदस्तीने ओढून बाहेर काढले. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी मारहाण केली. विशेषतः त्यांच्या पायावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले, ज्यामुळे त्यांचे पायाचे हाड फ्रॅक्चर झाले.
मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या वसीम मिर्झांना एका पत्रकाराच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांचा भाऊ त्यांना जालन्यातील सरकारी रुग्णालयात घेऊन गेला. अखेर, आज सोळा दिवसानंतर बीड शहर पोलीस ठाण्यात सुरक्षारक्षकांविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल केली आहे.या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.