संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ युद्ध?
मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

बीड – संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी कार्यकर्त्यांचे व्हिडिओ समोर आणले जात असल्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. राजकीय हेतूने हे व्हिडिओ वापरले जात असून, सामाजिक चळवळींसमोर अडचणी उभ्या करण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जरांगे पाटील म्हणाले, “राजकीय नेते एखाद्या प्रश्नामध्ये गुंतले की, आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना अडचणीत आणले जाते. आता ‘तुझा व्हिडिओ, माझा व्हिडिओ’ अशी शाळा सुरू झाली आहे. मॅटर दाबण्यासाठीच आतून हे सर्व घडवले जात आहे.”
त्यांनी पुढे इशारा दिला की, “लवकरच अनेकांचे व्हिडिओ बाहेर येतील. समाजाने या खेळीला बळी पडू नये आणि मूळ प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे.”
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजूनही चर्चांना उधाण आले असून, यामागील राजकीय आणि सामाजिक संबंध शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.