पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी गांजा पिणारा पोलीस निलंबित.
जिल्ह्यातील गुन्हेगारीसह पोलिसांचे वर्तन देखील सुधारणे आवश्यक.

बीड (प्रतिनिधी):- बीड पोलीस अधिक्षक नवनीत काँवत यांनी अवैध धंदे आणि गैरकारभारावर निर्बंध आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असताना दुसरीकडे त्यांच्याच खात्यातील कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत. अन्य कुठे नव्हे तर थेट पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानीच दि.४ मे रोजी रात्री ९ ते ९.३० च्या दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक यांनीच गांजा पिताना रंगेहात पकडले. या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या पोलीस अधिक्षक यांच्या निवासस्थानच्या डागडुजीचे काम सुरु असल्याने ते सध्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी आहेत. ४ मे रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान ते आपल्या कुटुंबासह घराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाळू बहिरवाळ हा दरवाजा लाऊन आता गांजा पित होता. पोलीस अधीक्षकांनी स्वतः खूप वेळ दरवाजा ठोठावून ही दार उघडत नसल्याने त्यांना शंका आली.काही वेळानंतर बाळूने दरवाजा उघडला तेंव्हा आत गांजाचा वास आला. त्यानंतर पोलीस अधिक्षक यांनी शिवाजी नगर पोलिसांना बोलावून बाळू बहिरवाळची जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याचे आदेश दिले. यावेळी बाळूने गांजाचे सेवन केल्याचे अहवालातून समोर आल्यानंतर त्याच्यावर शिवाजी नगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस क्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून, कामात हलकर्जी पणा करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर, अधिकाऱ्यावर देखील लक्ष असल्याचे या कारवाईतून दिसत आहे.