धक्कादायक ! परळी तालुक्यात परप्रांतीय तरुणीवर सामूहिक बलात्कार.
तीन नराधम पोलिसांच्या ताब्यात.

बीड(प्रतिनिधी) परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारात तिघा नराधमांनी एका परप्रांतीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली आहे. या प्रकरणात चौघांविरोधात अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस स्टेशन परळी ग्रामीण प्राथमिक माहितीनुसार, २० वर्षांची एक परप्रांतीय तरुणी रेल्वेने मुंबईवरुन हैदराबादकडे जाणार होती. परळी स्टेशनवर उतरुन ती एका हॉटेलमध्ये जेवत असताना तृतीयपंथी पूजा गुट्टे हिची तिच्यावर नजर पडली. पूजा हिने तिच्याशी संवाद साधत तिची गरज जाणून घेतली आणि काम देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पूजा हिने सतीश मुंडे व मोहसीन पठाण यांना बोलावून घेतले.
यानंतर ते तिघे पीडित मुलीला मोटरसायकलवर बसून अस्वलंबा येथील भागवत कांदे याच्याकडे गेले. त्या ठिकाणी या तिघांनी या परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणात डायल ११२ ला एका नागरिकाने फोन करत घटनेची माहिती देताच पोलिसांनी या प्रकरणात सतीश मुंडे, मोहसीन पठाण व भागवत कांदे यांना ताब्यात घेतले आहे. तर पूजा गुट्टे या तृतीयपंथीचा परळी ग्रामीण पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि नंतरच्या काळातील गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा हा गुन्हेगारीसाठी कुख्यात झाला होता. यानंतर पोलिसांनी कठोर उपाययोजना करण्याचा निर्धार केला होता. मात्र, त्यानंतरही बीडमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे बीड पोलीस यंत्रणेवर सातत्याने टीका केली जाते. आता परळीतील सामूहिक अत्याचार प्रकरणात बीड पोलीस काय करणार, हे पाहावे लागेल.