राष्ट्रवादी भवन समोर खड्डेच खड्डे,आमदार संदीप क्षीरसागराना कामाचा विसर !
पावसात सरपते सह नागरिकांचा बेशरम झाड लावून निषेध.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील बार्शी रोड वरील राष्ट्रवादी भवन ते अक्सा मशीद चौक हा मुख्य रस्ता मोठमोठ्या खड्ड्यांनी अडथळ्यांनी भरला असून, वाहनधारक, पादचारी, विद्यार्थी आणि रुग्ण दररोज प्रचंड त्रास सहन करत आहेत. या गंभीर स्थितीबाबत निवेदन ईमेलद्वारे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनवणे यांना पाठवले गेले, तरीही कोणतीही दखल घेतली गेली नाही.
दोन दिवसांपूर्वी आमदार संदीप क्षीरसागर यांनी नगरपरिषदेत नवनियुक्त मुख्याधिकाऱ्यांसह आढावा घेतला, तरीही स्वतःच्या कार्यालयाजवळील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले. यामुळे नागरिकांना प्रतिकात्मक निषेध करावा लागला. आज स्वातंत्र्य दिनानिमित्त मिलिंद सरपते यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी पावसात भिजत बेशरम झाड लावून आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, पालकमंत्री अजित पवारांनी तातडीने रस्त्याची पाहणी करून डांबरीकरण करावे; अन्यथा पुढील दौऱ्यांमध्ये काळे झेंडे दाखवून निषेध, मतदानाचा बहिष्कार आणि “मुख्याधिकारी हटाव – बीड शहर बचाव” या घोषणाखाली व्यापक जनआंदोलन उभे राहील.
बीड शहरातील बार्शी रोडवरील असलेल्या राष्ट्रवादी भवन समोर,संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयाजवळील रस्त्यांचा विसर फक्त असुविधा नाही, तर जनप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचे प्रत्यक्ष उदाहरण आहे. निवेदन ईमेलद्वारे सूचित केले गेले तरी दखल घेतली गेली नाही; परिणामी नागरिकांना प्रत्यक्ष निषेध करावा लागला. हा प्रकार फक्त रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नाही, तर प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या जबाबदारीबाबत जागरूकतेचा अभाव अधोरेखित करतो.
पावसात भिजत नागरिकांचा निषेध त्यांच्या धैर्याचे, सुरक्षिततेसाठी केलेल्या संघर्षाचे आणि सरकारच्या निष्क्रियतेविरुद्ध केलेल्या प्रतिकाराचे प्रतीक आहे. स्थानिक प्रशासन आणि पालकमंत्र्यांनी त्वरित रस्त्याचे डांबरीकरण आणि सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करणे गरजेचे आहे. अन्यथा नागरिकांचा रोष वाढेल आणि जनआंदोलन टाळणे अशक्य ठरेल.या निषेधात सहभागी नागरिकांमध्ये आगा खान, गफार खान, मुजीब सर, अल्ताफ शेख, वायभट, सय्यद मुस्ताक,जफर खान,यांचा समावेश होता.