माय-लेकीसह तिघींवर लोखंडी पाईप,रॉडने हल्ला !
चार ते पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल.

बीड (प्रतिनिधी)बीड जागेच्या कारणावरुन शिवीगाळ करत चार ते पाच जणांनी माय-लेकीसह तिघींवर लोखंडी पाईप आणि रॉडने हल्ला केल्याची घटना दि. २५ ऑगस्ट रोजी बीड तालुक्यातील चऱ्हाटा येथे घडली. या हल्ल्यामधील दोघींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान चार ते पाच जणांनी केलेल्या बेदम मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पुरुषांकडून महिलांना एवढी अमानुष मारहाण झालेली असतांनाही बीड ग्रामीण पोलीस मात्र या प्रकरणात मारहाणीचा किरकोळ गुन्हा दाखल करण्याच्या प्रयत्नात आहेत. संबंधीत आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी नातेवाईकांची मागणी आहे. बीड शहरापासून जवळ असलेल्या चऱ्हाटा येथे शेख रिजवाना शेख बबनीन, शेख मुमताज शेख बबनीन आणि शेख निलोफर शेख हारुण या तिघींना गावातीलच चार ते पाच जणांनी संगनमत करुन बेदम मारहाण केली आहे. शेख बबनीन यांच्या घरामागे बांधकाम सुरु आहे. तेथील जागेच्या कारणावरुन शेख बबनीन यांच्या कुटुंबियांचा आणि तेथीलच शेख युनूस यांच्यात वाद झाला होता. शेख युनूस व इतरांनी शेख मुजम्मील शेख बबनीन यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेख मुजम्मील यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शेख युनूस व इतरांविरुद्ध एनसी दाखल केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरुन शेख युनूस शेख महेबुब व इतर चार ते पाच जणांनी संगनमत करुन शेख मुजम्मील यांच्या कुटुंबातील महिलांना बांधकामाजवळ बोलावून तुम्ही आमच्यावर केस केली, आता तुम्हाला मारतो असे म्हणून लोखंडी पाईप आणि रॉडने मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीत शेख मुमताज शेख बबनीन, शेख रिजवाना शेख बबनीन आणि शेख निलोफर शेख हारुण या तिघी जखमी झाल्या आहेत. महिलांना मारहाण करतांनाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.