बीडमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ ! तीन घर फोडली.
तब्बल साडेचार लाखांचा ऐवज लंपास,नागरिकात भितीचे वातावरण.

बीड(प्रतिनिधी)बीड शहरात मागील काही महिन्यांत पाळत ठेवून चोरी करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
बीड शहरातील बार्शी रोडवरील,धांडे नगर भागातील सावतानगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरी कोणी नसल्याचे पाहून तब्बल तीन घरांवर दरोडा टाकून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून साडेचार लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
गौरीपूजनासाठी गावी गेलेल्या कुटुंबांचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक. ३० ऑगस्ट रोजी मध्यरात्री शिक्षक दिलीप शेळके हे कुटुंबासह गावाकडे गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या भाड्याच्या घराचा कडीकोंडा तोडून बेडरूममधील कपाट फोडले. घरातील दागिने व रोकड असा एकूण २ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला.त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायिक सुधाकर मुळे यांच्या घरीही चोरट्यांनी हात साफ केला. मुख्य दरवाज्याचा कोंडा तोडून लोखंडी कपाटातील १ लाख ११ हजार ५०० रुपयांचा ऐवज त्यांनी लंपास केला.दरम्यान, परिसरातीलच शिक्षक गणेश शिंपले यांच्या घरातही घरफोडी झाली असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने व रोकड असा १ लाख २० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविला.
अशाच प्रकारे याच भागातील तीन घरांमधून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून तब्बल ४ लाख ७४ हजार ५०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.ही घटना उघडकीस आल्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. गौरीपूजनाच्या मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबे गावाकडे गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी एकाच वेळी तीन घरांना लक्ष्य केले. ऐन सणसुदीत धाडसी चोरीमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी या भागात रात्रीची ग्रस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.