विद्युत खांबाला दुचाकी धडकून तरुणाचा मृत्यू.
गुत्तेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी,बीड नगर मार्गावरील घाटपिंपरी गावाजवळ झाला अपघात.

बीड : बीड ते अहिल्यानगर राज्य महामार्गावरील घाटपिंपरी येथे तरूणाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या विद्युत खांबावर दुचाकी धडकली. यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान घडली. राहूल अशोक कोकरे असे मृत तरूणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील राहूल अशोक कोकरे (वय २६) हा धामणगावहून गुरूवारी रात्री दुचाकीवरून गावाकडे निघाला होता. गावाजवळ येताच एका वळणार दुचाकीवरील ताबा सुटल्याने रोडलगत असलेल्या विद्युत खांबावर दुचाकी धडकली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. धामणगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डाॅ.पूजा रणवीर यांनी शवविच्छेदन केले. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार सोपान येवले, होमगार्ड तुषार वामन यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. दरम्यान, आज सकाळी शोकाकुल वातावरणात घाटपिंपरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुत्तेदाराच्या निष्काळजीपणाचा बळी
बीड ते अहिल्यानगर राज्य महामार्गावरील धामणगांव ते घाटपिंपरी या रोडलगत महावितरणे गुत्तेदाराच्या माध्यमातून नियमबाह्य विद्युत खांब उभारले आहेत. अगदी रोडच्या साईट पट्याला लागूनच हे खांब असल्याने यावर दुचाकी आदळली. गुत्तेदारांने नियमानुसार काही अंतर सोडून जर विद्युत खांब उभे केले असते तर हा बळी गेला नसता, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.