घरफोडी,दागिने चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त.बीड शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई.

बीड(प्रतिनिधी) बीड शहर मधील पिंगळे गल्लीतील रहिवासी धनराज गुरखुदे हे त्यांच्या पत्नीच्या उपचारासाठी कुटुंबासह छ.संभाजीनगर येथे गेले होते. त्या काळात घराला कुलूप लावून ते बाहेर गेले असताना, अज्ञात चोरट्याने घराची कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला व घरातील सोने-चांदीसह मौल्यवान वस्तू चोरी केल्या.
ही गंभीर घटना घडल्यानंतर पोलीस ठाणे बीड शहर येथे फिर्यादी मार्फत गुन्हा दाखल झाल्यावर पोलिस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी तात्काळ तपास गतीमान करण्याच्या सूचना बीड शहर पोलिसांना दिल्या. तपासादरम्यान तांत्रीक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित हा स्थानिक रहिवाशी शिवा नंदलाल गुरखुदे असल्याचे उघड झाले. त्याचा शोध घेतला असता, आरोपी हा चोरीनंतर बीड शहरातून गायब झाला होता. त्याच्यावर याआधीही जबरी चोरी, मारामारी असे विविध गुन्हे दाखल असून तो सतत गुन्हेगारी करणारा व बीड पोलिसांच्या अनेक गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी होता. दरम्यान, गुप्त माहितीच्या तसेच आधारे पोलिसांना कळाले की आरोपी शिवा हा नांदेड येथील गणेशोत्सव कार्यक्रमांना नियमित जात आहे. ही माहिती मिळताच बीड पोलिसांच्या पथकाने नांदेड येथे गुप्तपणे सापळा लावला त्यावेळी आरोपी हा गणेशोत्सव कार्यक्रमात आला असताना पोलिसांनी योग्य वेळी दबा धरून आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय महेश जाधव, पोलिस अंमलदार गहिनीनाथ बावनकर व राम पवार यांनी केली.