उपसरपंचाचा एअरगन मधून हवेत गोळीबार !
वाढदिवस साजरी करतात की दहशत निर्माण? गुन्हा दाखल.

बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये हातात शस्त्र बंदूक घेऊन फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे बीड पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड पोलिसांना सूचना करून हातात शस्त्र घेऊन फोटो व व्हिडिओ व्हायरल करणारा वर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही काही राजकीय नेत्यांना कायद्याचा धाक उरला नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
गेवराई तालुक्यातील रुई गावाचे उपसरपंच सचिन खरवडे यांनी त्यांच्याच वाढदिवसाच्या कार्यक्रमात एअर गनमधून हवेत गोळीबार करून उपस्थितांना थक्क केले. गावातच झालेल्या या प्रकारामुळे कायद्याचा धाक शिल्लक राहिला आहे का?असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दहा महिन्यापूर्वी सरपंच देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्हा प्रशासनाने अलर्ट मोडवर येऊन बीड जिल्ह्यातील शेकडो पिस्तूल परवाने रद्द केले होते. अशा कठोर निर्णयानंतरही जर एअरगन अथवा इतर शस्त्रास्त्रांचा वापर करून वाढदिवसा दिवशी, सर्वांसमोर गावात गोळीबार होत असेल तर कायद्याचा धाक कोणालाही राहिला नाही, हे दिसून येत आहे.
याबाबत तलवाडा पोलिस प्रशासनाने कोणती कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अशा प्रकारच्या बेधडक कृतींमुळे सामाजिक वातावरण दूषित होत असून गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. राजकीय नेते वाढदिवस साजरी करतात की दहशत निर्माण करतात?असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला पडला आहे. उपसरपंच सचिन खरवडे विरोधात तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे.