
बीड(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात मागील आठ-दहा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिके पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे. याच धक्क्यातून आणि वाढत्या कर्जाच्या बोजामुळे पांगर बावडी (ता. बीड) येथील शेतकरी गहिनीनाथ सोपान पवार (वय 65) यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी पहाटे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवार यांनी तीन वर्षांपूर्वी बडोदा बँकेकडून एक लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मात्र मागील वर्षापासून ते हप्ते वेळेवर भरण्यास असमर्थ ठरले. त्यामुळे मूळ कर्जासोबत व्याजाचा डोंगर वाढत गेला. त्यात यंदा मुसळधार पावसामुळे उभे पीक पाण्यात गेले. या आर्थिक संकटामुळे पवार सतत चिंतेत होते. शेवटी नैराश्यातून त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.
घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल मोराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
दरम्यान,शेतकरी गहिनीनाथ पवार यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी शासनाने तातडीने मदत जाहीर करून त्यांनी घेतलेले कर्ज माफ करावे,अशी मागणी कुटुंबीयानी केली आहे.